Friday, October 23, 2009

kolhapur

 

अघळपघळ पण ताठ : कोल्हापूर

- उदय गायकवाड
कोकणच्या सागरकिनाऱ्यापासून गडचिरोलीच्या जंगलापर्यंत पसरलेला महाराष्ट्र हा बहुजिनसी प्रदेश आहे. वेगवेगळ्या भागांमधल्या माणसांच्या वागण्या-बोलण्याच्या तऱ्हा, जगण्याच्या पद्धती, स्वभाववैशिष्ट्यं याबाबतीतही महाराष्ट्रात भरपूर विविधता आहे. वर्षानुवर्षं आपापली वैशिष्ट्यं जपत, वाढवत हे सर्व भाग एकमेकांसोबत राहत आले आहेत. यातूनच महाराष्ट्राच्या बहुविध-बहुपेडी संस्कृतीचा कोलाज तयार झाला आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे विविध रंग उलगडणारी ही मालिका सुरू करत आहोत.
या अंकात कोल्हापूरविषयी...

रांगडेपणाबरोबर गुरगुर आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी कुठली?
कोल्हापूर. नदी-तलावात मस्तीत डुंबावं, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि कर्रकर्र वाजणारी पायताणं घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापुरातला प्रत्येक पुरुष बाळगतो. तसं पाहता, इथं स्त्रिया म्हणजे "बाईमाणसं'देखील मिरवण्यात मागे नाहीत. त्याही सोन्यानं मढलेल्या. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन, त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या. तर सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही-लोेण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या. अर्थात 20-25 तोळ्यांचे दागिने सहज त्यांच्या अंगावर चकाकताना दिसतील. कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसूत्र, हातात बिल्वर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्णफूल, कुड्या, वेल पाहायला मिळेलच. इथले पुरुषसुद्धा दागिने वापरण्यात मागे नाहीत. गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनख, हातात सोन्याचं कडं, बोटांत अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो. पश्चिमेकडचा अतिडोंगराळ भाग आणि सांगलीचा पूर्वेकडील अति दुष्काळी भाग सोडला तर उर्वरित दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समृद्धी नांदते. हळद, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, भात अशा पिकांबरोबरच मुबलक पशुधन, हीच इथली समृद्धीची गुपितं. कृष्णा-पंचगंगा तर इथल्या जीवनदायिनी!
ईर्ष्या आणि उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला! घर बांधायचं असो किंवा लग्न-बारसं असो; ते दणकेबाज झालंच पाहिजे, ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापमानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरणं आणून बांधायची, त्याबरोबर पाच-पन्नास मंडळींना पुरेल असा "गारवा' आणायचा. "गारवा' ही तर भन्नाट पदार्थांची रेलचेल. भाकरी, पाटवडी, अंबील, घुगऱ्या, दही-भात, शेंगदाण्याची चटणी, कांदा असं दुरड्या भरून, वाजत-गाजत बहिणीनं तोरण घेऊन यायचं. भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं. मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा.
लग्न ही तर आठ-दहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही. हळद जात्यावर दळायला आजूबाजूच्या बायका-मुलींना जमवायला सुरुवात झाल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चुडा, गुगुळ, हळदी, साखरपुडा, अक्षता, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यंतचे सगळी विधी पार पाडायचं म्हटलं तरी दहा-पंधरा दिवस वातावरण उत्साहानं भारलेलं राहतं. उखाण्यांपासून वरातीतल्या पेंगे (झोपेची डुलकी)पर्यंत धम्माल मजा असते. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्या-घेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा-नवरीचे पोषाख. "मुलाचे कपडे कोण काढणार?' "मुलाचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत' आणि "मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत' हे सहजच बोललं जातं. पुढे बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरची मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला, की विचारपूस होते. ""काय, हिकडं कुठं?''
""आमच्या भाच्याचं लग्न ठरलंय, म्हणून कपडे काढायला आलोय.'' "कपडे काढणं' म्हणजे "खरेदी करणं' हा खास इथला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांना त्यापुढची चर्चा अधिक खुमासदार वाटेल.
""मग कुठे काढले कपडे?''
""मुलीचे चंद्ररूप वालावलकरमध्ये आणि मुलाचे रेमंडमध्ये.''
""मग?''
""मग काय! आम्ही दोघांचे कपडे काढून सोळंकीत आइस्क्रीम खायला आलोय.''
आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याच्या परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नाही.
"चौकश्या' करणं हा इथल्या रिकामटेकड्यांचा खास उद्योग. खरं तर याला "दुसऱ्याची मापं काढणं' असा वाक्‌प्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्‌प्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापदं, अनेकवचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत. "पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय' असं वाक्य इथे सहज कानावर पडतं. "पॅन्ट'चं अनेकवचन आमच्याकडे "पॅन्ट्‌स' असं न होता "पॅन्टी' होतं. भाषेच्या अशा अनेक करामती इथं होतच असतात. "निघालो आहे' असं म्हणण्याऐवजी जरा जोर देऊन "निघालोय' असा शॉर्टकट आम्ही सर्व क्रियांसाठी वापरतो. उदा. खायलोय, करायलोय, जायलोय, बघायलोय, टाकायलोय, यायलोय वगैरे.
तसं पाहता कोल्हापुरी भाषेला एक वेगळाच बाज आहे. इथे शिवीचा आवर्जून वापर होतोच; पण कोल्हापुरी अस्सलपणा किंवा झणझणीतपणाबरोबर "शिव्यां'च्याही अनेक छटा इथे दिसतात. "ये रांडंच्या' हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं, तेच "काय रांड्या, कुठं गेलतंस?' ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरुवात असू शकते. "ते रांडंचं...' असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं; पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानुभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं. म्हणजे "ते रांडंचं लई भारी पडलं बघ!', "ते रांडंचं लई शिकलंय रे!', "ते रांडंचं असंच राहिलं बघ!' वगैरे. पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. शब्दाचा अर्थ शिवीजन्य असला तरी तो इथं आप्तजनांसाठीच आहे. शिक्षक, मित्राचे वडील, समाजातील प्रतिष्ठित यापैकी कोणालाही हे बिरूद लावून बोलण्यास इथे मुभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण याशिवाय इतर शिव्यांनी उद्धार सुरू झाला तर मात्र कोल्हापूरकरांचा इगो दुखावला जाऊ शकतो. मग मात्र "पायताण' अथवा "तलवार' असे दोन आणि फक्त दोनच पर्याय कोल्हापूरकरांना माहीत आहेत. आणि हो; इथे शिवीमध्ये प्राण्यांचा वापर होऊ शकतो. प्राधान्यक्रमावर घोडा, गाढव इत्यादी!
इथल्या इतर काही भाषिक वैशिष्ट्यांची ओळख नोंदवणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनेक भाववाचक नामांचं आम्ही अनेकवचन करू शकतो. म्हणजे प्रेमं, भुका, चैन्या! बोलताना "हं, तुमी करा प्रेमं आणि आमी बघत बसतो!'; "काय, चैन्या करायलंस!'; "चला, आमानी भुका लागल्यात!' असं म्हटलं जाऊ शकतं. तसंच "केस'चं "केसं', "दगड'चं "दगडं', "पॅन्ट'चं "पॅन्टी' वगैरेही इथे सर्रास होऊन जातं.
आणखी एक खासियत म्हणजे "तो', "ती', "ते' हे अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, आणि नपुसकलिंगासाठी वापरायचं, असं व्याकरणशास्त्र म्हणतं. पण इकडचं व्याकरण जगावेगळं आहे. "तो गेला' असं म्हणण्याऐवजी "ते गेलं की' असं म्हणून व्याकरणाची आम्ही खांडोळी करू शकतो. इथल्या स्त्रिया बोलताना "मी आले' असं म्हणण्याऐवजी "मी आलो', "मी गेलो' वगैरे म्हणतात. असं का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येतं, की हे मराठा राजधानीचं गाव आहे. "आम्ही आलो', "आम्ही गेलो-चाललो' वगैरे विधानं ही राजघराण्यातील व्यक्तींच्या बोलण्यातून आलेली आणि इथल्या माणसांच्या बोलण्यात, भाषेत, संवादात रुजली आहेत.
इथल्या चौकातल्या मंडळाजवळ किंवा तालमीच्या दारात बसून सुरू असणारी वर्णनंसुद्धा एकदम झकास! इथली "नाद कराय नाही', "नादखुळा रे...' अशी खास कोल्हापुरी रचना महाराष्ट्रभर नेली ती अवधूत गुप्ते यांनी. कोणी दुसऱ्याला एखादी गोष्ट अतिरंजित करून सांगत असेल किंवा मैत्रिणीला कडेला घेऊन सांगत असेल, तर जाता जाता "फशीव', "गंडीव' असा आवाज टाकून गेलं की भलतीच अडचण होऊ शकते. ही गोष्ट फक्त इथेच घडते. फुटबॉल आणि हॉकी हे आमचे "गावखेळ' आहेत. इथे मैदानात शिट्‌ट्यांबरोबरच शेलकी वाक्यं ही चिअरअपसाठी असतात आणि नंतर इतरांना त्यांच्या हायलाइट्‌स चौकात उभारून सांगताना "नादखुळा रे', "एकदम गड्डा जाम', "खटक्यावर ब्यॉट जाग्यावर पलटी' हे मॅच, कुस्ती, अपघात, प्रेमप्रकरणं यापैकी कशासाठीही सोईने वापरायचं "विशेषण वाक्य' असतं.
हां, आणखी एक आठवलं. इथल्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं', "तशी मी गावायची नाय,' वगैरे... हे सुचतं कसं, यापेक्षा ही या गावाची ओळख बनत गेली आहे, हे महत्त्वाचं! चेष्टामस्करीलासुद्धा एक खुलेपणा असावा लागतो. तो इथं आहे. इथं अनेक "टर्मा'ही (टर्म) तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, ""काय, बसणार काय डब्बलशीट?'' खऱ्या अर्थानं हे सारं आघळपघळ.
पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर "जोशी कुठं राहतात हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील...""अरे, त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे. ""हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एक पायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल. त्याच्या जरा पुढं गेला की पाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथं बायका हायेतच; त्या त्यांच्याच!'' एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला ""ए बारक्या, जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं "आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर "पावनं, गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार. "पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजे खांब, चावी म्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच. त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द, वाक्‌प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं.
शिवाय इथे ऍडिशनल बोनस म्हणून "दाद' कशी द्यावी याचं खास प्रशिक्षणाचं पॅकेजही आहे. इथे कुस्तीला, तमाशातल्या नाचाला, ढोलकीच्या तालाला, शास्त्रीय संगीताला, रश्शाला, मटणाला, सिनेमाला, खेळाला, जनावराला "दाद' देण्याचे वैविध्यपूर्ण असे प्रकार आहेत. शिट्टी कधीही वाजवायची नसते. विशिष्ट दाद, अदा, अर्थ, झटका ही लावणीत वापरण्याची शिट्टीची ठिकाणं. पण ढोलकीवर थाप पडल्यापासून अनेक ठिकाणं खास असतात. ढोलकीचा आवाज बारीक होत जातो तेव्हा आपला आवाज बंद ठेवून "बारीक' म्हणून आवाज येऊ शकतो, तीही "दाद'! सही मागायला नाही, पण "हेऽ झकास! पुन्यानदा व्हायला पाहिजे!' असं त्या कलाकाराला खासगीत भेटून इथली माणसं नंतर सांगतीलच, पण घरी येण्याचंही आमंत्रण देतील.
इथे मैदानातलं चिअरअप आणखीनच जोशपूर्ण! खास प्रतिस्पर्धी संघावर भीतिदायक किंवा आक्रमक छाप टाकायची असेल तर पहिल्याच टप्प्यात प्रभावी कृती केली जाते, त्यासाठी इथे हमखास "हाबकी डाव' असा शब्दप्रयोग केला जातो. "सिनेमाला दाद' याबाबत अमान मोमीन या कोल्हापूरच्या पण वास्तव्याला अमेरिकेत असणाऱ्या एका रेडिओ प्रोग्रॅमरने सांगितलेला किस्सा छान आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, थिएटरच्या चौकात जाऊन गर्दी जास्त कुठून बाहेर येते ते पाहावं. गर्दीतल्या एखाद्याला विचारलं तर तो जे सांगेल त्यावरून सिनेमाचं तिकीट काढायचं. त्यातही कोल्हापुरी प्रेक्षक असेल तर "शिनेमा एकदम खल्लास', "दिलप्यानं तोडलंय रेऽ', "आणि "वैजी जाळ हाय' असं दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या सिनेमाचं वर्णन ऐकायला मिळू शकतं. याला "दाद' म्हणावं!
"निवांत!' या शब्दाची व्युत्पत्ती शोधायला गेलं तर त्याचं मूळ नक्की कोल्हापुरातच असेल. खूप कष्टाची तयारी असली तरी इथलं जगणं प्रत्यक्षात निवांत आहे. पण हे पेन्शनरांचं गाव नाही. मग निवांत म्हणजे नेमकं काय? तुम्ही कोणालाही विचारा, "काय चाललंय?' किंवा "काय विशेष?' तर उत्तर एकचः "निवांत!' कारण गावाची लांबी-रुंदी पाच बाय सात किलोमीटर. म्हणजे कामाच्या ठिकाणी जायला किंवा यायला जास्तीत जास्त अर्धा तास. त्यामुळे त्याआधी आणि त्यानंतर निवांतच वेळ असतो. मग चौकात गप्पा नाहीतर चकाट्या. त्यामुळे "निवांतपणा' हा रक्तातच भिनलेला. शेती असणारेसुद्धा ऊसवाले. उसाचं पीक हे जरा इतर पिकांपेक्षा वेगळं. एकदा त्याची लागवड केली की तीनदा पीक फक्त कापून फॅक्टरीला पाठवायचं, नाहीतर गुऱ्हाळाला. त्याला पाणी पाजणं हे काम. मोटर सुरू केली की पाटाने सरीतून ते आपोआप जातं. सगळ्या शेताला पाणी पोहोचलं का, हे पाहायला इथला शेतकरी वेगळी ट्रिक वापरतो. मातीचं एक ढेकूळ किंवा दगड उचलून अपेक्षित दिशेने फेकतो. जर "डुबुक' असा आवाज आला तर पाणी पोचलंय. मग मोटरचा खटका (स्विच) बंद. झालं, वर्षातनं दोन-चार वेळेला कारखान्याचं बिल किंवा गुळाची पट्टी मिळाली की काम खल्लास. अर्थातच इथलं सगळं कसं "निवांत'! म्हणूनच मोटरसायकल घेऊन गावात फिरायला रिकामी झालेली इथली मंडळी शौक जपतात आणि सामान्य माणसंसुद्धा किरकोळ काम करून माशाचा गळ घेऊन निवांत टाइमपास करताना दिसतात.
माशाच्या गळावरून आणखी एक मुद्दा सांगितलाच पाहिजे, तो म्हणजे इथल्या तळ्यांचा. हे तळ्यांचं किंवा कमळांचं गाव. "कोल्लंं' म्हणजे कमळ. म्हणून कोल्लापूर, अशी एक व्युत्पत्ती गॅझेटियरमध्ये नमूद आहे. संपूर्ण तटबंदी, त्याभोवती खंदक आणि सात प्रवेशद्वारं असलेल्या या गावात 24 तळी असल्याचे उल्लेख आढळतात. नियोजनाच्या अभावामुळे आणि परिणामांचा विचार न केल्याने इथली सगळी तळी खरमाती, कचरा, निर्माल्य-मूर्त्यांनी बुजली; पण तळ्यांशी नाती मात्र सतत टवटवीत आहेत. "रंकाळा' हे त्याचं साक्षात उदाहरण. तरुणाई याच रंकाळ्याच्या काठावर फुलते. नजरानजर, आणाभाका आणि लग्नानंतर कोणी आपल्याकडे बघत नाही ना, हे लक्षात घेऊन लग्नाच्या बायकोच्या हातात हात घेऊन चालायचा प्रयत्न करणाऱ्या जोड्या, रिटायर मंडळी, आंबटशौकीन, व्यायाम करायला येणारी मंडळी या सगळ्यांशीच रंकाळ्यानं नातं जोडलं. अगदी आबालाल रहमान, बाबूराव पेंटर, माधवराव बागल अशा अनेकांच्या कुंचल्यांनी इथं पेंटिंग चितारली. अनेक कॅमेऱ्यांनी इथला सूर्यास्त टिपला. व्ही. शांताराम, दादा कोंडके, भालजी पेंढारकर यांनी सिनेमा चित्रीकरणासाठी रंकाळ्याची निवड केली. पर्यावरणीय मुद्यांसाठी झालेल्या अनेक आंदोलनांत सहभागी होऊन हजारो लोकांनी रंकाळ्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. आजही हा रंकाळा कोल्हापूरच्या गळ्यातला ताईत आहे.
भेळ ही कोल्हापुराची आणखी एक खासियत. नेहमीपेक्षा ही भेळ जरा वेगळी. राजाभाऊ हे भेळप्रकरणातलं अग्रणी व्यक्तिमत्त्व. इथले चिरमुरे हे पाणचट आणि पोकळ नसतात. थोडीशी खारट चव असणाऱ्या भरीव चिरमुऱ्यांची इथे झक्कास भडंग केली जाते आणि मग त्यात फरसाण, चिंचेचा कोळ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यावर कैरीची तिखट-मीठ लावलेली फोड कागदाच्या वाडग्यात घेऊन कागदी चमच्याने खायची. या भेळीचा आंबटगोडपणा जगण्यात नाही मुरला तरच नवल!
खाण्यापिण्याला दाद ही तर इथल्या चटपटीतपणाची करामत आहे. कोल्हापुरी मिसळीचा नाष्टा हा घाम फोडणारा असतो. एकदा ही मिसळ खाऊन पहा. मग दही-मिसळ, मटणाच्या शिळ्या रश्शाची मिसळ, भज्यांचा चुरा घालून मिसळ, दूधमिसळ असे पुढचे टप्पे खायला कोल्हापूर बुकिंग सुरू होईल. इथली मंडळी मटणाला "हावरी' आहेत असं म्हणतात. पण खरं तर तसं नाही. ती मटणावर प्रेम करतात, त्याबरोबर जगतात, असं म्हटलं तर चूक नाही. जन्मानंतर जी पाचवीची पूजा केली जाते तिथेच नैवेद्य म्हणून बकऱ्याची मुंडी आणि पाय दाखवले जातात. कदाचित त्याचा हा परिणाम असेल. इथे दिवाळीपासून पाडव्यापर्यंत खेडोपाडी "माही जत्रा' असते. मोटरसायकलवरून तब्बल 50-100 किलोमीटर "तिब्बलशीट' प्रवास करून माहीचं जेवण जेवायला जाणारे "मटणप्रेमी' इथेच भेटतात. हे जेवण थोड्याफार मद्यसेवनाने सुरू होतं. ढिगभर भातावर हवा तेवढा रस्सा यावेळी मिळू शकतो. मटणाचा खडा (फोड) चुकून एखादा आला तर आला, पण "रश्शासाठी जगावं' हा मूलमंत्र जपण्यासाठीच जेवायचं आणि या जेवणाला आमंत्रण असावंच लागतं असंही नाही. अनोळखी घरात मित्रांबरोबर आपण जाऊ शकतो. आपल्याला अगत्यपूर्वक जेवण मिळेल याची खात्री आहे आणि माणसं वाढली, असं यजमानांना वाटलं तर रश्शामध्ये पाण्याची घागर ओतून चटणी-मीठ टाकलं की बस्स! या रश्शाला इथे "खुळा रस्सा' असं म्हटलं जातं. हॉटेल किंवा थोड्या बड्या घरात जेवणाचा योग आला तर पांढरा रस्सा, पुलाव, गोळी पुलाव, दम बिर्याणी, खिमा असे खास पदार्थ मिळतील. शाही जेवणात 12 प्रकारचे रस्से असत. शिवाय कुंभार समाजात केली जाणारी रक्ती, घिसाडी समाजाकडून भाजून आणलेल्या मुंडीचा रस्सा, गावठी कोंबडीचा रस्सा, अगदी गरीबाघरी अगत्यानं केली जाणारी भाकरी व अंड्याची पोळी (ऑमलेट), खर्डा, झुणका, दही हे आमचं मेनूकार्ड कोणाशी स्पर्धा करणारं नाही पण मिरवणारं मात्र आहे.
इथल्या दुधाला येणारी सायसुद्धा इथल्या दाटपणाची ओळख देणारी आहे. दुधापासून बनलेली बासुंदी आणि कंदी पेढे हे नृसिंहवाडीसारख्या परिसराचे खास पदार्थ आहेत. इथे कवठाची बर्फी हासुद्धा स्पेशल पदार्थ. आणखी एक- कोल्हापूरकडच्या परिसरात चहा जरा जास्त गोड असला तरी दुधाचा असतो. कोल्हापूर शहरातल्या जुन्या चौकांमध्ये आजही म्हशीचं धारोष्ण दूध तिथल्या तिथे पिळून फेसासह दिलं जातं. सोडा-लिंबाला जसा फेस येतो तसा या ग्लासमधल्या दुधावर येतो. मिश्यांना किंवा ओठांना लागलेला फेस शर्टाच्या हातोप्यानं पुसला की गावभर फिरायला ओके! इथं "सोळंकी आइस्क्रीम' हे प्रस्थ तब्बल तीन-चार पिढ्या घरा-घरांशी नातं जोडून आहे. बाहेरून आलेली कोणतीही कंपनी- कोणतंही आइस्क्रीम इथं पाय रोवू शकलं नाही. त्याशिवाय थंडाई इथं तालमीत पैलवान तयार करतात किंवा आइस्क्रीमच्या दुकानात. "दुकानात' हा शब्द मुद्दाम नोंदवला. कारण बारा महिने फक्त आइस्क्रीम विकणारी प्रशस्त अशी पन्नास तरी दुकानं या गावात आहेत. त्या दुकानांमध्ये ब्रॅंडेड शीतपेयं आजही मिळत नाहीत. इथं अजूनही "सोडा फाउंटन' आहेत. नुकतंच सचिन पिळगावकरांनी पुरवलेल्या माहितीप्रमाणे जगात असं फाउंटन असणारी दोनच शहरं आहेत, त्यापैकी कोल्हापूर एक आहे. आजही इथे बाटलीतला गोटी सोडा आहे.
दुधातला आणखी एक खास पदार्थ म्हणजे "खरवस'. खरवसाच्या वड्या आणि बर्फी हे अफलातून आणि दुर्मिळ पदार्थ. कॅरामल पुडिंग ही जरी पार्टीची स्वीटडिश असली, तरी खरवस ही इथली म्हशीला झालेल्या पिल्लाच्या जन्मानिमित्त तयार झालेली सेलिब्रेशन डिश आहे. तशी आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे "काकवी'. हा आमचा देशी "शुगरकेन जॅम'! शिवाय उसाचा रस, भेळ, चिरमुऱ्याचे लाडू, चिरमुरे हे फक्त टाइमपास आयटम.
एव्हाना इथल्या नॉनव्हेजला जगमान्यता मिळाली आहे. अगदी जगभरातल्या पंचतारांकित हॉटेलांच्या मेनूकार्डवर कोल्हापुरी रेसिपीजना "मटण कोल्हापुरी' अशी ठसठशीत जागा मिळाली आहे. पण ही जागा का मिळाली; या प्रश्नाचं उत्तर कोल्हापुरी चटणीशी जोडलेलं आहे. ही चटणी तयार करणं म्हणजे एक दिव्य असतं. विशिष्ट प्रमाणात सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस मसाल्याचे पदार्थ क्रमाने एकत्र होत जाऊन त्यासोबत कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीपूड एकजीव होते. त्याचा रांगडा वास असतो. त्याला "कोल्हापुरी चटणी' म्हणून ओळखलं जातं. रस्सा-मटणाचं ती ईप्सित आहेच; पण नवी चटणी बनते त्या दिवशी गरम भाकरी, तेल आणि चटणी खायला नशीब लागतं आणि त्यासाठी कोल्हापुरात जन्म घ्यावा लागतो!
बटाटेवडा हे सामान्यांचं मधल्या वेळेचं मिष्टान्न! पुण्यातला जोशीवडा आणि बॉम्बेवडा यांना कोल्हापूरचा वडा पुरून उरतो. कारण घसघशीत आकार नि डाळीच्या पिठाचं जाडजूड आवरण! तो खमंग आणि खुसखुशीत तळलेला असतो. वडा-पाव किंवा कटवडा खाऊनच बघा! आणि मिलनची कांदाभजी, माळकरांची जिलबी, खासबाग किंवा बावड्याची मिसळ, चोरग्यांच्या मिसळीचा कट, एल.आय.सी. कॅंटीनची खांतोळी व इंपीरियलची थंडाई तर भन्नाटच!
एकूणच, कोल्हापुरी पदार्थ हा अनेकांचा वीक पॉइंट आहे.
पुणेरी बाकरवडी आणि कोल्हापुरी बाकरवडी अशी स्पर्धा असली, तरी बनवणाऱ्या माणसांची ठेवणच वेगवेगळी आहे. आजही कोल्हापुरात बारसं ते मृत्यू अशा प्रवासात अनेक जेवणावळी होतात; पण कोणी मयत झालं तर दहा दिवस आजही त्या घरात चूल पेटत नाही. इथली माणुसकीची ठेवण औरच आहे. शेजारधर्म म्हणजे काय, याचा हा वस्तुपाठ. गल्लीत कोणी मयत झालं तर प्रत्येकाच्या घराची कडी वाजवून निरोप दिला जातो. शहरीकरणाच्या बदलांबरोबर ही रीत मात्र बदलेली नाही. अंत्यविधीसाठी लागणारं साहित्य आणायला पैसे कोणीतरी परस्पर खर्च करतं, पण त्या कुटुंबीयांकडून ते नंतर संबंधिताला दिले जातात. दहा दिवस शेजारी व नातेवाईक त्या घरातील सर्वांचं जेवण, चहा, नाष्टा आपणहून आणून देतात. कोल्हापूर शहरात तर अंत्यसंस्काराला आवश्यक लाकूड-शेणी महापालिका मोफत पुरवते. तसं इतर साहित्य ज्या ठिकाणी मिळतं ती मोजकी ठिकाणं आहेत. तिथला संवाद हा विशेष आहे. रात्री-बेरात्री त्या घराचं दार वाजवलं की वरची खिडकी उघडून विचारणा होते, ""बाई की बापय?'' जर "बाई' असं उत्तर दिलं, तर ""विधवा की सवाशीण?'' असा पुढचा प्रश्न विचारला जातो आणि काही मिनिटांत सगळं साहित्य पावतीसह ठेवलं जातं. या गावातली आणखी एक ठळक नोंद केली पाहिजे. इथले फूलवाले मयताच्या हाराच्या दराची घासाघीस करत नाहीत. ठेवले जातील तेवढे पैसे घेतले जातात. रात्री फुलांची दुकानं बंद झाल्यानंतर मृतदेहाला हार लागणार, हे लक्षात घेऊन ते दुकानाबाहेर लटकावून ठेवले जातात. आपण हार घेऊन पैसे ठेवले किंवा नंतर दिले तरी चालतात, ही इथली संस्कृती आहे. शेजारधर्म सांभाळण्याइतकीच दुश्मनीही इथे असू शकते; पण एखादा दु:खद प्रसंग घडला, की तिथे दुश्मनीसुद्धा धावून जाते आणि एकोपा होतो.
"एकोप्या'वरनं आठवलं. देशभरात हिंदू-मुस्लिम द्वेषाची बीजं पेरली गेली असली तरी त्याला कोल्हापूर हा अपवाद आहे. इथे मशिदीच्या चौकटीवर "गणपती' दिसू शकतो. गणपतीचं दर्शन घेऊन बाबूजमाल दर्ग्याचं दर्शन घेणारे मुस्लिम-हिंदू तुम्हाला इथे नेहमीच दिसतात. पीराच्या उत्सवात पुढाकार हिंदूंचा; इतकंच नव्हे, तर पीर आणि गणपती एका मांडवात असणार, हेही दृश्य इथलंच! बकरी ईद मुस्लिमांशिवाय इतरांना जरा लवकर यावी असं वाटतं, कारण बिर्याणी आणि खीर चापून खाण्याची ती संधी असते. नकळत दोन-चार घरांतून आमंत्रण किंवा डबा येणार हे नक्की असतं. नृसिंहवाडीच्या संगमावर चालणारे अंत्यसंस्कारांनंतरचे विधी ब्राह्मणाकडून हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचेही होताना दिसतात. हे इथल्या संस्कृतीचे आदर्श पैलू आहेत.
इन्व्हेस्टमेंट! पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवणं किंवा बॅंकेत ठेवणं हा प्रकार इथल्या जुन्या वळणाच्या लोकांच्या अंगवळणी पडणं अवघड. हा सगळा खरं तर चोरीचा मामला असतो. म्हणजे वेगळं काही नाही; पण एकत्र कुटुंबात कुणाला कळू नये यासाठी करायचा हा खटाटोप. अनेकदा बॅंकेचं पत्र आलं तर घरात भांडणाचं निमित्त व्हायचं, म्हणून तिकडं जायचं नाही. बाजारहाटीतले बाजूला काढलेले पैसे वर्षात साडेतीन मुहूर्ताला हळूच काढून अगदी ग्रॅम-दोन ग्रॅम सोनं घेऊन ठेवायचं, ही बाईमाणसांची आयडिया आजही सुरू आहे. पुरुष मात्र पैसे ठेवतात ते भिशीमध्ये. भिशी हे प्रकरण खाण्या-पिण्याचं नाही, पण दिवाळीला बोनस नाही मिळाला तरी तोंड वाकडं होऊ नये म्हणून! उच्च मध्यमवर्गीयांनी मात्र रिटायरमेंटनंतर मिळालेले पैसे काही बॅंकांत व्याजदर जास्त म्हणून गुंतवले; पण अनेक पतसंस्था, बॅंका बुडाल्या आणि तेसुद्धा बुडाले. खरं तर आज विश्र्वासार्हता कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा जमिनी-सोन्याकडं गुंतवणुकीचा कल दिसतो. म्हणजे अडीअडचणीला तारण ठेवून पैसे उभे करता येतात, हा विश्र्वास त्यांना वाटतो.
आपल्या घराचं स्वप्न पाहताना मूळचे कोल्हापूरकर कधी फ्लॅट सिस्टिममध्ये रमत नाही. दोन-तीन दशकांपूर्वी शिक्षक, क्लार्क अशा मध्यमवर्गीयांनी हजार-पंधराशे स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेऊन दोन-तीन खोल्यांची घरं बांधली. घरांना आई-वडील किंवा स्वत: पती-पत्नींचं नाव देण्याची क्रेझ. पण नाव मात्र ठसठशीत आणि कोरीव. ते बघूनच अभिरूची स्पष्ट होणार हे नक्की. "मातृ-पितृ-छाया' या कॉमन नावापासून अफलातून कॉंबिनेशन्स इथे दिसतील. "प्रगुंपा' असं एका घराचं नाव. अर्थ काय? प्रमिला गुुंडोपंत पारगावकर. नावातल्या पहिल्या अक्षरांपासून घराचं नाव तयार करण्याची ही किमया फक्त कोल्हापुरातच दिसते.
इथली ऐसपैस परिसर असलेली बैठी घरं अंगण-परसाला जोडून साधेपणा जपतात. अगदी अलीकडे इथली वाडासंस्कृती कमी झाली; पण अजूनही हाकेला "ओ' मिळते. पाहुणे आल्यावर कपभर दूध किंवा लिंबू मिळवण्यासाठी किंवा अंगती-पंगतीसाठी इथं शेजार आहे. आईचा स्वयंपाक व्हायचा असेल तर शेजारच्या मावशींकडून डब्यात भाजी घेण्यासाठी लाजण्याचा प्रश्नच येत नाही. आजही उन्हाळ्यातले पापड, सांडगे, शेवया करताना एकमेकींच्या सोयीनुसार "टाइम-टेबल' होतं. एकमेकींना मदत करणाऱ्या काकू-मावशींशी रक्ताच्या नात्यापलीकडची नाती आजही आहेत. बायका-मुलं सुटीत डबे घेऊन पन्हाळा, कात्यायनी, वाडीला जाताना दिसतात, तर पुरुष मंडळी त्यांच्या एंजॉयमेंटला "रस्सा मंडळ' करतात. म्हणजे काय? भाकरी-भात आपापल्या घरातून आणायचा, वर्गणी काढून फक्त मटण करायचं आणि निवांत बसून जेवायचं.
नदी-तलावावर मासे पकडण्यासाठी दिवसभर गळ घेऊन बसणारेसुद्धा इथे दिसतात; तेही स्वत:च्या करमणुकीसाठी. तालमीत व्यायाम, फुटबॉल किंवा हॉकीचा सराव, बुद्धिबळाचा पट, कॅरम मंडळ किंवा मर्दानी खेळाचा सराव ही इथली मनोरंजनाची साधनं. नाटक, गाण्याचा कार्यक्रम, भजनी मंडळ हीसुद्धा मनोरंजनाची माध्यमं आजही वापरात दिसतात. इथली ग्रामीण आणि शहरी अशी तफावत मात्र विशिष्ट बाज असणारी आहे. मुंबई-पुण्यात घोड्यांच्या शर्यतीचा रेसकोर्स हा श्रीमंती खेळाचा आकर्षणाचा विषय आहे. इथं पूर्वी रेसकोर्स होतं, हत्तीची साठमारी, चित्त्याकडून किंवा ससाण्याकडून शिकार हे चित्तथरारक खेळ होते. आजही इथे म्हशी-रेडकांच्या शर्यती, बकऱ्यांच्या टक्करी, कोंबड्यांच्या झुंजी, कबुतरांच्या शर्यती, चिख्खल गुट्टा, पतंगाच्या स्पर्धा या पुरुषांच्या मनोरंजनाचा भाग बनतात. आज संगणकाच्या युगातही स्त्रियांच्या उखाण्यांच्या स्पर्धा, फुगड्यांची स्पर्धा, पाककलेच्या-रांगोळीच्या स्पर्धा होतात. स्त्री-पुरुषांच्या भजनीमंडळाच्या स्पर्धाही रंगतात.
"म्हशी' हा इथे चर्चेचा विषय असतो. अत्यंत देखण्या, चकचकीत काळ्या म्हशीची लांबसडक शिंगं, शेपटीचे कातरलेले केस आणि कानाच्या नक्षीदार पाळ्या (मुद्दाम केलेल्या) या गोष्टी त्यांना सौंदर्यस्पर्धेत बक्षिसं मिळवून देणाऱ्या ठरतात. मुलींच्या सौंदर्यस्पर्धांना मात्र इथे उत्तेजन मिळालं नाही. सलवार-कमीज किंवा पंजाबीत वावरणाऱ्या मुली थोडीफार फॅशन करतील; पण त्यांना अजून जीन्स आणि शॉर्ट टी-शर्टकडे सरकता आलं नाही. अशा प्रयत्नांना घरांतून विरोध आहे. "ते आटलेल्या कापडाचं कपडं घालून फिरू नको' अशी धमकीवजा सूचना ही इथे मिळते. इथल्या उच्चवर्गीयांच्या मुला-मुलींचा वावर असणारी कॉलेजच ड्रेसकोडचं समर्थन करणारी आहेत. कोल्हापूरबाहेरून आलेली मंडळी थोडीफार अशा नव्या फॅशनचा वापर करताना दिसली, तरी सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेला मिळतंजुळतं वागण्याचा दबदबा असतो.
वेशभूषेचा उठावदारपणा लग्नसमारंभात सगळीकडेच दिसतो, पण कोल्हापुरात दसऱ्याच्या शाही समारंभात तो आवर्जून पाहण्यासारखा असतो. महाराष्ट्रात लवाजम्यासह सीमोल्लंघनाला जाण्याची परंपरा फक्त कोल्हापुरात आजही पाहता येते. जुन्या राजवाड्यापासून आणि अंबाबाईच्या मंदिरातून निघालेल्या पालख्या, तोफगाडा, रणवाद्यं, घोडे, उंट, संस्थानचं पायदळ, शाहीर व पैलवानांचा ताफा, छत्र-चामरं, ध्वज, तलवारी-भाले, जरीपटका, मानकरी बॅंड, पोलिस आणि मिलिटरीचा बॅंड अशी भव्य लवाजम्याची मिरवणूक सूर्यास्तापूर्वी दसरा चौकात पोचते. शहरातील मान्यवर, प्रतिष्ठितांसह नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होतो. आजही "छत्रपती' पोचल्यानंतर संस्थानाचं राष्ट्रगीत वाजतं, पूजाविधी होऊन बंदुकीच्या फैरी झडतात आणि लक्कडकोटातून आपट्याची पानं लुटण्यासाठी झुंबड उडते. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राजा सर्वांना भेटतो. ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची पालखी सीमोल्लंघनाहून परतताना दलितवस्तीतून जाते. तो दिवस दिवाळीपेक्षा मोठा साजरा होतो, कारण जातीतील विषमतेची दरी संपवण्याची ही कृती म्हणजे परिवर्तनाचा मानबिंदू आहे. छत्रपती शाहूंनी केलेले सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग हे आजही इथे घट्ट रुजून आहेत. शहाण्णव कुळी, खानदानी वगैरे बिरुदं लावणारी मंडळी असली, गावात बारा बलुते राहणाऱ्या स्वतंत्र गल्ल्या आणि स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृहं असली, तरी इथली सामाजिक एकतेची वीण मात्र घट्ट आहे. सार्वजनिक उपक्रमांत सर्वजण एकदिलानं एकत्र येतात. दसऱ्याची ही प्रथा शंभर वर्षांनंतरही अस्तित्वात आहे. दसऱ्याच्या समारंभात दरबारी पोषाख, जोधपुरी, बाराबंदी, तुमान, सुरवार, इराफी विजार अशा पांढऱ्या, मोती रंगाच्या कपड्यावर पगडी किंवा कोल्हापुरी थाटाचा जरीफेटा किंवा लहरी फेटा, त्याचा तुरा आणि शेला ऐटीचं प्रदर्शनही घडतं.
या ऐटीत फेट्याइतकंच महत्त्व आहे ते पायताणांना. कोल्हापुरी चपलेमध्येसुद्धा काही खास प्रकार आहेत ते त्यांच्या बांधणीनुसार. कुरुंदवाडी, कापशी, दोनतळी, तीनतळी, विंचू (करकर वाजणारं) अशा वेगवेगळ्या चपला इथल्या ग्रामीण भागात तयार होतात. जनावरांचं कातडं कमवण्यापासून चप्पल तयार करण्यामध्ये इथले कारागीर वाकबगार आहेत. कारागिरीचा उल्लेख झाला म्हणून सांगितलंच पाहिजे, की इथे सोन्या-चांदीचे दागिने, मूर्तिकाम करणारे कारागीर आपली वैशिष्ट्यं जपणारे आहेत. पण उद्यमनगरमधले पॅटर्नमेकर आणि लहान लहान सुट्या भागांची निर्मिती करणारे कारागीर हे तर देेशातल्या मोठ्या उद्योगांचे खरे आधार आहेत. त्यांच्या कौशल्याला योग्य मोबदला मिळतो की नाही, यापेक्षा अनेक यंत्रांतील महत्त्वाच्या सुट्या भागांच्या निर्मितीचं साधं श्रेयसुद्धा त्यांच्याकडे जात नाही, हा खरा सल आहे. इथल्या गुऱ्हाळघरामधला गुळव्या हासुद्धा दुर्लक्षित राहिलेला. उसाच्या रसापासून गुळापर्यंतच्या सर्व टप्प्यांची देखरेख करायची आणि अचूक वेळेला इंधनाचा ताव कमी करून काहील केव्हा उतरवायची, याचा निर्णय घेणारा हा "टेक्नॉलॉजिस्ट'. साखर कारखान्यातील चीफ केमिस्ट आणि उद्योगाच्या मॅनेजरपेक्षा तसूभरही कमी नसणाऱ्या या कारागिराचा व्यवसाय हा अजून हाय-फाय व्यवस्थापन किंवा इंजिनियरिंग कॉलेजात शिकवत नाहीत. गुळव्या, पॅटर्नमेकर, चांदी-सोन्याची आटणी काढणारा, कातडं कमावणारा, कोल्हापूर-मिरजेत तंतुवाद्यं तयार करण्याबरोबरच त्यातून अचूक सूर-ताल निश्चित करणारा, फेटे बांधणारा, तुतारी वाजवणारा, असे अनेक उपेक्षित कारागीर इथे आहेत आणि हाच इथला मनुष्यबळ आणि कौशल्यांशी निगडित असणारा कणा आहे.
वाद्यांवरून आठवलं. तुतारी वाजवणं हे कोण्या सोम्या-गोम्याला जमणारं नाही. पण इथं ते जोशपूर्ण वातावरण आणि "खच्चून स्वागत' करणारं वाद्य आजही वापरात आहे. इथल्या ग्रामदेवतांशी निगडित असणाऱ्या यात्रांमध्ये नदीचं पाणी देवळाच्या पायऱ्यांवर ओतण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पण त्या मिरवणुकीत किंवा पीराच्या (पंजे) मिरवणुकीत "पूईई-ढबाक' हे स्पेशल वाद्य वापरलं जातं. ते तालविशिष्ट आहे. "डब-डबडब' असा सततचा ताल आणि अतिशय छोट्या वाद्यातून निघणारा सूर यात असतो. हे अजब वाद्य नाचाची नशा चढवतं. त्याच्याशी डॉल्बी किंवा पाश्चिमात्य संगीत स्पर्धा करू शकत नाही. "जोतिबाची सासनकाठी' नाचवणं आणि कडेपूरचे ताबूत हे इथलं वैशिष्ट्यही पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे. त्यालाही वाद्याची साथ असते. एकूण काय, म्हशींच्या स्पर्धा ते सण, उत्सव, लग्नातला "गुगुळ', लग्नानंतरचा जागर, गोंधळ किंवा यल्लमाचा लिंब या सर्वच ठिकाणी वाद्यांचा मेळ हा इथल्या समाजजीवनाशी झाला आहे.
जसं लहानपणी मारलेल्या उड्यांमुळे इथल्या माणसाचं रंकाळ्यावर प्रेम जडलं आहे. तसंच त्याचं पंचगंगेवरही प्रेम आहे. पोहायला सगळे इथंच शिकतात. याच पाण्यावर इथली समृद्धी. पण त्याबाबत कृतज्ञ आहेत इथली माणसं. कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे शेकडो दिवे नदीच्या घाटावरच्या सगळ्या पायऱ्या, देऊळ आणि दीपमाळेवर प्रज्वलित होतात. संथ पाण्यात त्याचं प्रतिबिंब मावळणाऱ्या चंद्रबिंबासह दिसतं तेव्हा स्वर्ग अवतरतो आणि एरवीही रात्री चिअर्सपासून रश्शावर ताव मारण्याचं हे मैदान असू शकतं.
नदीचा घाट आणि त्या परिसरातील मंदिरं असं सगळं जसं अद्वितीय आहे तशाच आणखी काही बाबी आहेत. कळंब तलावातून कमानीवरून आलेला सायफन पद्धतीचा पाण्याचा पाट आणि पाण्याचा खजिना, रंकाळ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या धुण्याच्या चाव्या, अंबाबाई-विठोबाचं मंदिर, साठमारी, ही ठिकाणं पाहण्यासारखी. इथले पुतळेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण. घोड्याच्या दोन पायांवर उभा राहिलेला ताराराणींचा पुतळा, तसंच इतर अनेक व्यक्तींचे पुतळे इथे आहेत. अगदी "रेड्यांची टक्कर' दाखवणारासुद्धा पुतळा इथे आहे आणि इतिहासाच्या खुणा सांगणारे अनेक स्तंभही! पुतळे बनवण्याची कौशल्यं जपणारे आणि जगणारे पेंटर, रवींद्र मेस्त्री, वडणगेकरांपासून अनेक दिग्गज इथल्या मातीला आकार देणारे. अल्लादिया खॉंसाहेब, गोविंदराव टेंबे, केसरबाई, केशवराव भोसले, मंगेशकर कुटुंबीय, सुरेश वाडकर ते अलीकडच्या पिढीतला अभिजित कोसंबी ही मंडळी शास्त्रीय, नाट्य, सुगम संगीतातली मंडळी; लोकगीताच्या परंपरेतील हैदरसाहेब, शाहीद पिराजीराव सरनाईकापासून शिवशाहीर राजू राऊतासारखी खड्या बोलाची शाहीर मंडळी; वि. स. खांडेकर, रणजित देसाई, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम, राजन गवस असे साहित्यिक आणि जगदीश खेबुडकरांसारखा कविमनाचा माणूस इथंच घडला. एकूण काय, इथं काहीच कमी नाही. खाशाबा जाधवांसारख्या ऑलिम्पिक वीराची परंपरा आजही वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यांच्यासारखी इथली तरुण मुलं टिकवू पाहताहेत.
इथली माणसं स्वत:कडे जरा ताठ मानेनंच बघतात. आपल्याला इंग्रजी येणार नाही आणि बाहेरगावी आपलं जमणार नाही, असा न्यूनगंड त्यांच्यात डोकावतो. दुसऱ्याकडून शहाणपण ते सहज स्वीकारू शकत नाहीत. खरं तर बौद्धिक कुवत असूनही इथल्या माणसावर "खेडवळ' असा शिक्का बसला आहे. इथल्या माणसाला पुण्या-मुंबईचं खास आकर्षण नाही. आणि हो; इथून कुणी नोकरीसाठी बाहेर गेलं तरी ते दोन दिवसांसाठी तरी कोल्हापुराकडे त्यांचे पाय वळतातच. येतानाच प्लॅन होतो. ठरलेले मित्र, ठरलेल्या जागा, ठराविक जेवण! हे वर्षभराचं बॅटरी चार्जिंग असतं. अशी गावाकडे खेचून आणण्याची ताकद इथल्या रश्शात असावी.
गूळ आणि चपलेमुळे कोल्हापूर महाराष्ट्राला-देशाला परिचयाचं झालं, पण कोल्हापूरची उर्वरित महाराष्ट्राशी नाळ मात्र जोडली गेल्याचं दिसत नाही. कोकणाची मुंबईशी जशी नाळ आहे तशी कोल्हापूरची थोडीफार कोकणाशी आहे; पण तसं ते स्वतंत्रच राहिलेलं दिसतं. इथल्या प्रगतीसाठी खमका नेता कोल्हापूरला नाही. राजर्षी शाहूंच्या विकासकामाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर ठळक असं इथं फारसं घडलं नाही. व्हिजन असणारा नेता नाही हे दुर्दैव. कोल्हापूरबाहेरून आलेली हजारो मंडळी मात्र इथं पाय रोवू शकली. ती एव्हाना कोल्हापूरचीच झालेली आहेत. स्थलांतर होऊन स्थायिक झालेले आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोचले आहेत. मात्र इथले फारसे बाहेर जाऊन तिकडचे झाले नाहीत, हे या मातीचं वैशिष्ट्य असावं.
निर्वासित म्हणून आलेले सिंधी, मारवाडी, गुजराथी, कानडी हे इथलेच झाले. लिमलेटच्या गोळ्या विकून जगणारे आता बाजारपेठेचा कणा ठरत आहेत. काल-परवापर्यंतच्या भेळीच्या गाड्यांशेजारी आज चायनीज, मेवाड कुल्फी, पाणीपुरी, कच्छी दाबेली, दावणगिरी डोसा, केरळी शहाळी यांच्या तांबड्या गाड्यांनी गर्दी केली आहे. इथली भेळ, मिसळ, उसाचा रस, आइस्क्रीम मात्र तिथंच राहिलं आहे. इथल्या तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे, पण आपलं गाव सोडून नाही. गावातच किंवा अगदी घराजवळ व्यवसाय किंवा नोकरी मिळावी, अशी मानसिकता त्यांना बाहेर जाऊच देत नाही. वडिलोपार्जित घराच्या वाटण्या करत करत ती लहान होताहेत. शिक्षणाच्या अभावामुळे रिक्षा, टेंपो, पानाची टपरी इतकीच त्यांची उडी मर्यादित राहते आहे.
खरं तर या गावाला साहित्यिक, गायक, कवी, कारागीर, तंत्रज्ञ अशी मोठी परंपरा आहे, पण ती म्हणावी तितकी फोफावली नाही. याची कारणंही गुलदस्त्यात आहेत. आजही इथल्या प्रतिभेची पुसटशी जाणीव होते. क्षणभंगुर आनंदात हे सारं संपून जातं. तरी आपुलकी जपणारी, माणुसकी जपणारी इथली अघळपघळ माणसं मात्र ताठ आहेत हे नक्की!

उदय गायकवाड
261-इ, 18, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क,
कोल्हापूर - 416 003.
मोबाइल ः 9822194393
uday_gd@yahoo.com / udaygd@gmail.com



--
-Varpe Digvijay Dilip
mobile no.+919923484706

No comments:

Post a Comment